शुक्रवार, अक्टूबर 29, 2004

मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय

काल बोलता बोलता विषय निघाला आणि आमच्या बिल्डिंगमधल्या मुलांना आजपासुन दिवाळीची सुट्टी आहे असं कळलं. "दिवाळीची सुट्टी" ...... हे शब्द आणि मुख्यतः त्यांचा अर्थ मी विसरलो आहे असं माझ्या लक्षात आलं. दिवाळीसारख्या प्रसन्न सणाची कल्पना आता आपल्या लेखी " ऑफिसला ४ दिवसांची सुट्टी" इतकी क्षुद्र झाली आहे हे पाहुन मला माझाच राग आला आणि त्याबद्दल विचार करताना खालचे शब्द सुचले .....

मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय

धावत जाऊन माझ्या रोजच्या बाकावर बसायचय,
रोज सकाळी खड्या आवाजात राष्ट्रगीत म्हणायचय,
नव्या वहिचा वास घेत पहिल्या पानावर
छान अक्षरात आपलं नाव लिहायचय,
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय

मधली सुट्टी होताच वॉटरबॅग सोडुन
नळाखाली हात धरुनच पाणी प्यायचय,
कसाबसा डबा संपवत..तिखट-मीठ लावलेल्या
चिंचा-बोरं-पेरू-काकडी सगळं खायचय,
सायकलच्या चाकाला स्टंप धरुन
खोडरबर आणि पाटीने क्रिकेट खेळायचय,
उद्या पाऊस पडुन शाळेला सुट्टी मिळेल का
हा विचार करत रात्री झोपी जायचय,
अनपेक्षित सुट्टीच्या आनंदासाठी ....
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय

घंटा व्हायची वाट बघत का असेना
मित्रांशी गप्पा मारत वर्गात बसायचय,
घंटा होताच मित्रांचं कोंडाळं करुन
सायकलची रेस लावुनच घरी पोचायचय,
खेळाच्या तासाला तारेच्या कुंपणातल्या
दोन तारांमधुन निघुन बाहेर पळायचय,
ती पळुन जायची मजा अनुभवायला ....
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय

दिवाळीच्या सुट्टीची वाट बघतच
सहामाही परिक्षेचा अभ्यास करायचाय,
दिवसभर किल्ला बांधत मातीत लोळुन पण
हात न धुता फराळाच्या ताटावर बसायचय,
आदल्या रात्री कितीही फटाके उडवले तरी
त्यातले न उडलेले फटाके शोधत फिरायचय,
सुट्टीनंतर सगळी मजा मित्रांना सांगायला....
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय

कितीही जड असू दे.. जबाबदारीच्या ओझ्यापेक्षा
दप्तराचंच ओझं पाठिवर वागवायचय,
कितीही उकडत असू दे.. वातानुकुलित ऑफिसपेक्षा
पंखे नसलेल्या वर्गात खिडक्या उघडुन बसायचय,
कितीही तुटका असू दे... ऑफिसातल्या एकट्या खुर्चीपेक्षा
दोघांच्या बाकावर ३ मित्रांनी बसायचय,
"बालपण देगा देवा" या तुकारामांच्या अभंगाचा अर्थ
आता थोडा कळल्यासारखं वाटायला लागलंय,
तो बरोबर आहे का हे सरांना विचारायला....
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय

शुक्रवार, अक्टूबर 15, 2004

नावात काय आहे?

परवा संध्याकाळी फोन वाजला, मी उचलल्यावर तिकडुन प्रश्न आला "क्यान आय स्पिक टू मिस्टर अमौवल पलशानका ? " मला २ सेकंद काही सुधरेच ना! मग माझ्या लक्षात आलं की हे माझ्याच नावाचं अजुन एक "विलायती" रुप आहे (Palshikar मधला शेवटचा r silent समजुन) . तसे माझ्या नावाचे अनेक अपभ्रंश मला आता ठाउक आहेत. पण हे काहीतरी नविनच प्रकरण होतं.
आता मला सांगा, माझं "अमोल पळशीकर (spelled as: Amol Palshikar)" हे नाव उच्चारायला खरंच इतकं अवघड आहे का? त्यात एकपण जोडाक्षर सुद्धा नाहिये. पण त्या फोनवरची बाई ते उच्चारताना, आपल्याला दातांच्या डॉक्टरने जबड्यात किंवा जिभेला भुलेचं इंजेक्शन दिलेलं असताना बोलायला जितका त्रास होतो, तितका त्रास झाल्यासारखं बोलत होती. पण तिने खास विलायती ऍक्सेंट न वापरता माझं नाव नीट उच्चारलं असतं तर मला कळलं नसतं का, की तीचं शिक्षण भारतातच झालं आहे, मग तिचा तो केवढा अपमान झाला असता !!! या ऍक्सेंटच्या नादात इंग्रजी भाषेत उच्चारशास्त्र हादेखील एक महत्वाचा भाग आहे हे विसरुन जाणारे अनेक लोक आहेत.
आता तिला एकटीलाच काय दोष द्यायचा. माझ्या नावाचा सर्वात भयंकर अपभ्रंश करण्याच्या स्पर्धेत धोबी, किराणामालाच्या दुकानातले मारवाडी दुकानदार, दवाखान्यातले रिसेप्शनिस्ट हे देखिल मोठ्या हिरीरीने भाग घेतात. काही उदाहरणे खालिलप्रमाणे (अपभ्रंशपातळीच्या चढत्या क्रमाने),
१) पळसकर
२) पळसेकर
३) पालिशकर (कशाला पालिश करायचं काय माहित?)
४) पलसुलकर (!!!)
५) पेलसेकर
६) पालसवार (???)

माझ्या भावाला याहुनही वेगळे अपभ्रंश माहित असतिल याची मला खात्री आहे.
कुणीतरी (नक्की कोणी ते मला माहित नाही :D) म्हंटलंच आहे, की "नावात काय आहे? (What's in the name)", त्या "कुणीतरी"चं मला माहित नाही, पण इतर फारसं काही कर्तृत्व नसलेल्या माझ्यासारख्या माणसाला बाकी कशाने नाही तर फक्त नावाने लोक ओळखतात. म्हणुलच मला जर कोणी "नावात काय आहे?" हा प्रश्न विचारला तर माझं उत्तर असतं "या नावातच माझी ओळख आहे".

गुरुवार, अक्टूबर 14, 2004

हसू नका बरे !

याआधिच्या शून्य ह्या blog च्या comments मधे अजितला सांगितल्याप्रमाणे माझ्या "पूर्णमिदं पूर्णमदः" या नाटकातलं दुसरं गाणं लिहितो आहे. लहानपणी एका वर्तमानपत्रात (कुठल्या ते आठवत नाही) "हसु नका बरे" नावाचं एक सदर होतं. त्यात काही विनोद असायचे. पण माझ्या या blog साठी मात्र वाचकांनी शीर्षकाचा शब्दशः अर्थ घ्यावा ही नम्र विनंती. कधीकधी अतिउत्साहाच्या भरात माणुस ज्याप्रमाणे काहितरी बोलुन जातो तसंच अतिउत्साहाच्या भरात मी काहितरी लिहिलं आहे असं समजा.
तर या गाण्याची पार्श्वभुमी अशी आहे की शून्य आणि अनंत (infinity) एका माणसाला त्यांच्यात श्रेष्ठ कोण ते ठरवायला सांगतात आणि त्याला शेवटी कळतं की ते दोघंही "पूर्ण" (complete) आहेत. हे गाणं ३ पात्रांच्या तोंडी आहे.

नायक:

मीच का?
मला सांगा मीच का?
या कुटप्रश्नांची उत्तरं द्यायला मीच का?
मला सांगा मीच का?
शून्य श्रेष्ठ की अनंत सांगायला मीच का?
मागे पडले महाभाग दोन,
सांगा ह्यातील श्रेष्ठ कोण.

शून्य:

माझ्यातच सुरवात सगळ्याची,
माझ्यातच निर्मिती विश्वाची,
मजपासुन किंमत सर्वांची,
मीच साखळी अस्तित्वांची.

सुईच्या टोकाची लांबीही जास्त,
मातीच्या कणाची रुंदीही जास्त,
शून्यत्वापेक्षा तर सांगतो,
हवेतील अणूचे वजनही जास्त.

(तिसरं कडवं मला आत्ता आठवत नाहिये, आठवलं की लिहेन :D)

अनंत:

माझ्यातुन हे शून्य जन्मले,
माझ्यातुन हे विश्व निर्मिले,
माझ्यातच व्याख्या आत्म्याची,
माझ्यातच हे ब्रह्म साचले.

सागराच्या पाण्याचे थेंबही कमी,
वाळवंटाच्या वाळुचे कणही कमी,
माझी किंमत जाणुन घ्यायला,
मानवाच्या कल्पनेची झेपही कमी.

मजपासुन प्रवास विश्वांचा,
मजकडेच रस्ता अंताचा,
या वाटेतिल मुसाफिरा,
तू ठरव विजेता या वादाचा.

Chorus:

ऊँ पूर्णमिदं पूर्णमदः, पूर्णात् पूर्णमुदच्यते
पूर्णस्य पूर्णमादाय, पूर्णमेवावशिष्यते

नायक:
(श्लोकाचा अर्थ)
हेही पूर्ण, तेही पूर्ण,
पूर्णाचे निर्माते पूर्ण,
पूर्णातुन हे पूर्ण काढिले,
तरीही उरते हेच पूर्ण.

किमती तुमच्या भिन्नभिन्न,
तरी व्याख्या कशीकाय समान ही ?
पूर्णत्वाच्या व्याख्येने,
बांधली पुलाची कमान ही.

टोकाच्या जरी तुमच्या किमती,
कल्पना एकच आहे तुमची,
दोघांना ना काही व्याख्या,
प्रतिबिंबे तुम्ही परस्परांची.

जशा एकाच नाण्याच्या बाजू दोन,
कसंकाय सांगू श्रेष्ठ कोण ?


शुक्रवार, अक्टूबर 08, 2004

शून्य!

काल पुलंचं "एक शून्य मी" नावाचं पुस्तक वाचत होतो. तेव्हा माझ्या TE मधल्या फिरोदिया करंडकाच्या नाटकात मी लिहीलेलं शून्यावरचं गाणं आठवलं, तेच इथं लिहितो आहे.

हे शून्य म्हणजे आहे नक्की काय ?
हे शून्य म्हणजे आहे नक्की काय ?

संख्येमध्ये शून्य मिळविता फरक न पडतो संख्येत,
संख्येमधुनी शून्य काढिता बदल न घडतो संख्येत,
मग शून्य म्हणजे आहे नक्की काय,
हे शून्य म्हणजे आहे नक्की काय ?

संख्येला शून्याने गुणता उत्तर येती शून्यच ते,
स्वतःमधुनी "स्वत्व" वगळता शेष राहती शून्यच ते,
शून्यामध्ये शून्यचं मिळवा,
शून्यामधुनी शून्यचं वगळा,
नष्ट न होती शून्य हे !

अनेक अस्तित्वांच्या या गुंत्याची नक्की ओळख काय,
नसण्याचे असणे देणार्या ह्या शून्याची किंमत काय,
अस्तित्वही नाही,
नास्तित्वही नाही,
दोघांचे मिश्रण नाही,
दोघांचा अभावही नाही,
हेही आहे..तेही आहे...हेही नाही...तेही नाही,
मग शून्य म्हणजे नक्की काय,
हे शून्य म्हणजे आहे नक्की काय ???!!!

शुक्रवार, अक्टूबर 01, 2004

मिरवणुक, फसवणुक, हसवणुक की करमणुक

दरवर्षी अनंत चतुर्दशीला कुठेही न जाता मी घरीच असतो. माझ्या घराच्या अगदी जवळ नदी असल्यामुळे समोरच्या रस्त्यावरुन बरीच "मंडळं" विसर्जनासाठी जातात. तो "कार्यक्रम" माझ्या खोलीच्या खिडकितुन बघत बसण्यात माझा वेळ छान जातो.
यावर्षीचा देखावा काय वर्णावा !! एक तर माझ्या खिडकिच्या अगदी समोर एकमेकांपासुन २० फुटांच्या अंतरावर २ वेगवेगळ्या "सामाजिक कार्यकर्त्यांनी" उभारलेले २ "स्वागत कक्ष" होते. या स्वागत कक्षांपाशी थांबुन प्रत्येक मंडळाच्या एका प्रतिनिधीने एक नारळ फोडुन पुढे जावं अशी सर्वसाधारण अपेक्षा होती. (चिकित्सक वाचकांसाठी - ते नारळ स्वागत कक्षांतले प्रतिनिधीच मंडळांना पुरवत होते.)
त्यापैकी एका स्वागत कक्षात एक व्यक्ती सकाळपासुन ग्रामोफोनच्या अडकलेल्या रेकॉर्डसारखा "आगतम् स्वागतम् सुस्वागतम् .... आगतम् स्वागतम् सुस्वागतम्" एवढंच म्हणत होता. पण मी काही कामासाठी २ मिनिटं आत गेलो असताना एकदम "आगतम् स्वागतम् सुस्वागतम् .. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यनगरीत सर्व गणेशभक्तांचे हार्दिक स्वागत" असं जोरदार वाक्य ऐकल्यावर त्या अडकलेल्या रेकॉर्डला पुढे ढकलण्याच्या ताकदीचे कोण "गणेशभक्त" आले आहेत हे पाहण्यासाठी उत्सुकतनं मी हातातली कामं टाकुन अक्षरशः धावतच खिडकित आलो. रस्त्यावर एक "रथाचा" देखावा असलेली गाडी होती. त्या देखाव्यात रथ ओढुन न्यायला मोर आणि हंस या दोन्हीचा भास व्हावा अशा कोण्या पक्ष्याचे चित्र होते. दोन्ही बाजुच्या पक्ष्याच्या चोचींच्या मधे अनेक स्पिकर होते. त्या "रथाच्या" आत "सारथी" "बघं बघं अगं सखे कसं बुगु बुगु वाजतंय" हे "सुप्रसिद्ध लोकगीत" (म्हणजे popular folk song :P) वाजवत होता. त्या रथासमोर ८-१० वर्षे वयोगटातील काही मुले आणि त्यांच्यापेक्षा थोडी मोठी दिसणारी पण बौद्धिक वय त्याच वयोगटातले असेल अशी शंका येणारी काही माणसे नाचत होती. आणि त्या रथाच्या "टपावर" "बालशिवाजी"च्या पोशाखात एक मुलगा आपल्या तलवारीने त्या गाण्यावर ताल धरत होता. गणेशभक्तांच्या त्या "आगळ्यावेगळ्या" दर्शनाने मला अगदी भरुन आलं.
तेवढ्यात बाजुच्या स्वागत कक्षाच्या मंचावरुन धाड! असा सुतळी बॉंम्ब फुटल्यासारखा आवाज आला. मी चमकुन त्या दिशेला पाहिलं. त्या लोकांनी गणेशभक्तांच्या स्वागतासाठी वापरलेली युक्ती बघुन तर मी निपचितच पडलो. तिथे एक कसलिशी छोटी तोफच होती. बाजुला झेंडुची फुले होती (आचार्य अत्र्यांची नाही ... खरिखुरी फुलं). त्या झेंडुची फुलांच्या पाकळ्या तोफेच्या "तोंडी देउन" ते येणार्या प्रत्येक मंडळाला तोफेची सलामी देत होते. मी (मनात) म्हटलं छान!!! पण त्या तोफेचा नुसता आवाजच जास्त होता. बत्ती दिल्यावर त्यातल्या पाकळ्या फार तर १० फुटांपर्यंतच पोहोचत होत्या. त्या पाकळ्यांची उधळण गणेशाच्या मुर्तीवर व्हावी यासाठी ते प्रत्येक वाहनचालकाची/सारथ्याची गाडी वेगवेगळ्या पद्धतीने पार्क करण्याची जणू परिक्षाच घेत होते. त्या भाउगर्दीत एक उत्साही चालक आपल्या ट्रॅक्टरबरोबर तो स्वागत कक्षाचा मंच पण ओढुन घेउन जाता जाता थोडक्यात राहिला !!! नंतर त्यांच्याकडल्या पाकळ्या संपल्या. मग ते रस्त्यावर पडलेल्या अर्धवट जळालेल्या पाकळ्या गोळा करुन त्याच recycle करायला लागले!!!!!

ढोल-ताशांच्या ठेक्यात ज्ञानप्रबोधिनी सारख्या मंडळांचा कार्यक्रम मला आवडतो. पण यावेळी लग्नाचे बॅंड आणि speaker system चाच जास्त सुळसुळाट होता. ती खरंच विसर्जनाची मिरवणुक होती, गणरायाची काही लोकांनी केलेली फसवणुक होती का काही लोकांनी स्वतःचीच करुन घेतलेली हसवणुक होती ते मला ठाउक नाही .... पण या सगळ्यानी माझी मनसोक्त करमणुक झाली हे नक्की!!